Home क्रीडा अवयवदान जनजागृतीसाठी ४०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अवयवदान जनजागृतीसाठी ४०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या क्रीडांगणावर ‘खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अवयवदानाबाबत जनजागृती करणे तसेच अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण लाभार्थी यांच्या जिद्द, आरोग्य आणि सकारात्मकतेचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा यांचा संगम साधणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

या स्पर्धेत सुमारे ४०० विद्यार्थी तसेच २० अवयवदाते आणि प्रत्यारोपण लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे, एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, दत्तात्रय चौधरी, सुधीर चौधरी (डायरेक्टर, मास-टेक कंट्रोल्स प्रा. लि.) आणि आनंद मल्हार (संचालक, मल्हार कम्युनिकेशन) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात या उपक्रमामुळे अवयवदान चळवळीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः भविष्यात अवयवदान करण्याचा संकल्प जाहीर करत समाजापुढे आदर्श निर्माण केला. हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धा नसून अवयवदानाच्या पवित्र कार्याला समाजात बळ देणारा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या उपक्रमाचे आयोजन किशोर सूर्यवंशी, छाया किडनी केअर अँड रिलीफ फाउंडेशन, डॉ. अमित भंगाळे (आनंद हॉस्पिटल अँड डायलेसिस युनिट), सुखकर्ता फाउंडेशन आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश पाटील (डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स), डॉ. अतुल बारेकर, सौ. लीना लेले, सोनल चव्हाण, निकिता चौधरी तसेच व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर छोटेखानी मशाल रॅली काढण्यात आली. पुढे विद्यार्थ्यांसाठी ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या, तर अवयवदाते व लाभार्थींसाठी १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यती पार पडल्या. स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत जिद्द आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले.

अवयवदाते व लाभार्थी गटातील पुरुष विभागात १०० व २०० मीटर शर्यतीत वसीम पिंजारी, हर्ष शर्मा आणि प्रवीण आमोदकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. महिला विभागात सायराबी हमीद पिंजारी, वर्षा झोपे आणि मनीषा पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवले. विद्यार्थी गटात मुलांच्या विभागात ५ किमी व ३ किमी स्पर्धेत अजय वसावे आणि जयपाक पावरा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींच्या विभागात मधुरा वसावे आणि जैदु बारेला यांनी अव्वल स्थान मिळवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना लेले आणि सुभाष पवार यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रमात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश देत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.


Protected Content

Play sound