कोलंबो-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्रीलंकेत २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा समावेश आहे. विक्रमसिंघे यांनी गेल्या महिन्यात २७ जुलै रोजी गाले येथील रॅलीत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता.
विक्रमसिंघे यांच्याशिवाय नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये दोन बौद्ध भिक्खू आणि तीन तमिळ अल्पसंख्याकांचाही समावेश आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यासाठी सकाळी ९ ते ११ अशी वेळ देण्यात आली होती.
श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ३५ उमेदवारांनी भाग घेतला होता.