सोलन, वृत्तसंस्था | हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील कुमारहट्टी भागात एक गेस्ट हाऊसची इमारत कोसळली. ३५ जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. यात लष्कराच्याही अनेक जवानांचा समावेश आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. येथील रस्त्यावरून जात असलेले सैन्याचे जवान येथे जेवणासाठी थांबले होते, त्याच दरम्यान हा अपघात घडला. या सैनिकांसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. बचावकार्य सुरू आहे. अद्याप २३ जणांची सुटका करण्यात आली आहे. यात १८ सैनिक आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अद्यापही १४ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.