मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात एक अशा १० जागांवर मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी ५८ टक्के मतदान झालं होतं. या टप्प्यात किती मतदान होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. राज्यात दुपारी १.०० वाजेपर्यंत सरासरी ३५.४ टक्के मतदान झाले होते.
मतदानाचे देशभरातील चित्र :-
– पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे आणि कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
– अकोला जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात राजुरा, सुकांडा, अनसिंग या गावात नवरदेवांनी केले मतदान
– प. बंगाल : सीपीएमचे उमेदवार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर हल्ला, तृणमूलचा हात असल्याचा आरोप
– औरंगाबाद: धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
– मराठवाड्यात मतदानाविषयी ३३ तक्रारी. सोलापूर, नांदेड, हिंगोली मतदारसंघातून जादा तक्रारी
– तामिळनाडूत सकाळी ११ वाजेपर्यंत ३०.६२ टक्के मतदारांनी केले मतदान
– बुलडाणा येथे आमदार हर्षवर्धन सपकाळ मतदानासाठी सहकुटुंब रांगेत
– उत्तर प्रदेशमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २४.३१ टक्के मतदान
– उदगीर मतदारसंघातील जळकोट तालुक्यातील एका मतदान केंद्रात वयोवृद्ध आजी मतदानासाठी आल्या
– कर्नाटक: माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच.डी. देवेगौडा यांनी केले सपत्नीक मतदान
– उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सिक्री मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांनी बजावला मतदानाचा हक्क
– बिहारमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत १९.५ टक्के मतदान
– जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे नवविवाहित जोडप्याने केले मतदान
– हिंगोली येथे माहूर मतदान केंद्रातील इव्हीएममध्ये बिघाड
– कर्नाटक: उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी तुमकुर येथे केलं मतदान
– अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या खुशबू यांनी बजावला मतदानाचा हक्क
– तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान
– नांदेडमध्ये लग्नाआधी नवरदेवाने गाठलं मतदान केंद्र, साडेसहा वाजताच केलं मतदान
– मनीपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी इम्फाळमध्ये बजावला मतदानाचा हक्क
– पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी, पूत्र कार्ती आणि सून श्रीनिधीने बजावला मतदानाचा हक्क
– माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदेने केलं मतदान