जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, जळगाव जिल्हा परिषदेत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नाशिक येथील करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांना गती दिली होती. आता त्यांच्यावर राज्य सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबई येथील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) च्या प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व आता करनवाल करणार आहेत.

दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्णी लागली आहे. नायर यांनी नाशिकमध्ये आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या बदल्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनात आता नव्या दमाने कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच या दोन्ही महिला अधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती मिळत आहे.



