नागपूर-वृत्तसेवा : उपराजधानीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने नागपूर शहरात ‘हाय अलर्ट’ जारी केला असून संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७ एप्रिल रोजी सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात ही घटना उघडकीस आली. मेट्रो स्टेशननजीक असलेल्या एका घराच्या छोट्या बागेत एक संशयास्पद बॅग दिसून आली. घरमालकाने तपासणी केली असता त्यात जिलेटीन स्टिक्स असल्याचे लक्षात आले, ज्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. या बॅगेत १५ जिलेटीन स्टिक्स, ५० डेटोनेटर्स आणि ८ कनेक्टर्स असा स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला आहे.

माहिती मिळताच नागपूर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संपूर्ण परिसर सील केला आणि शोधमोहीम राबवून ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली. प्राथमिक अंदाजानुसार, ही स्फोटके गेल्या महिना- दीड महिन्यापासून तिथेच असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा संबंध काही दिवसांपूर्वी काटोल परिसरातील एका स्फोटक कारखान्यात झालेल्या अपघाताशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
ज्या ठिकाणी ही स्फोटके सापडली, तो परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जामा मशीद, पोद्दारेश्वर राम मंदिर आणि आरएसएस मुख्यालय यांसारखी महत्त्वाची ठिकाणे येथून अवघ्या काही अंतरावर आहेत. नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्फोटके तिथे कोणी ठेवली आणि त्यामागील नेमका हेतू काय होता, याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. सध्या संशयितांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.



