
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील आपत्कालीन सेवा किती गांभीर्याने चालवली जाते, याचा प्रत्यय आज उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केलेल्या अचानक पाहणीत आला. आयुक्त बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फायर स्टेशनची दुरवस्था पाहून उपमहापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

आपत्कालीन लँडलाईनच ठप्प
पाहणी दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फायर स्टेशनचा अधिकृत लँडलाईन क्रमांक मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले. “जर शहरात कुठे मोठी आग लागली, तर नागरिकांनी संपर्क कसा साधायचा?” असा संतप्त सवाल उपमहापौरांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, या गंभीर तांत्रिक अडचणीबाबत वरिष्ठांना लेखी कळवले आहे का, याची साधी माहितीही कर्मचाऱ्यांकडे नव्हती.
घाणीचे साम्राज्य आणि बंद पडलेला पंप
फायर स्टेशनच्या परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून आला. चहूबाजूंनी घाणीचे साम्राज्य पसरले असून नियमित साफसफाई होत नसल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली. इतकेच नव्हे तर, अग्निशमन बंबांमध्ये पाणी भरण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला पंपही अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले. ऐन उन्हाळ्यात आगीच्या घटना वाढण्याची शक्यता असताना यंत्रणा अशा प्रकारे निकामी असणे, हे शहरासाठी धोकादायक असल्याचे उपमहापौरांनी म्हटले.
आयुक्तांवर डागली तोफ
यावेळी उपमहापौरांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “आयुक्तांचा बंगला येथून अवघ्या दहा मीटर अंतरावर आहे. आपल्या घराशेजारी चालणाऱ्या या गंभीर समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष न जाणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे.” प्रशासकीय प्रमुखांच्या नाकाखालीच आपत्कालीन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
कठोर कारवाईचा इशारा
पाहणीअंती उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित विभागाला आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. “अग्निशमन दलासारख्या संवेदनशील विभागात अशी बेजबाबदारपणा खपवून घेतली जाणार नाही. तातडीने लँडलाईन सुरू करून परिसर स्वच्छ न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.



