
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शाहूनगर परिसरात आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन रविवारी उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीतून समाजाची प्रगती कशी साधता येते यावर सखोल मार्गदर्शन करत उपस्थितांना प्रेरणादायी विचारांचा संदेश दिला.

शाहूनगर सकल हिंदू समाज समितीतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २९ रोजी सायंकाळी पाच वाजता रिंगरोडवरील ललित कला भवनजवळील हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शाहूनगर परिसरातील मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शोभायात्रा तपस्वी हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मुख्य हिंदू संमेलनास प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर धर्मशास्त्र मार्गदर्शक विनायकराव जोशी तसेच पश्चिम क्षेत्र प्रचारक प्रमुख अनंत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वारकरी गोपाळ सोनार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अँड. प्रवीण झंवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. चंद्रकांत जिवडे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
या प्रसंगी अनंत देशपांडे यांचा सत्कार हिंदू मेळावा समितीचे अध्यक्ष अशोक पोपटराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला, तर विनायकराव जोशी यांचा सत्कार समितीच्या उपाध्यक्षा स्वाती देवरे यांनी केला. प्रास्ताविक सार्थक हितेंद्र टेकावडे यांनी केले, तर अध्यक्ष अशोक जाधव यांनी आपल्या मनोगतातून आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख वक्ते अनंत देशपांडे यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम आणि राष्ट्रनिर्मितीत त्याचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गोपाळ सोनार, गणेश सूर्यवंशी तसेच पुरोहित भुषण महाराज पाठक यांना व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सन्मानाचा गौरव केला. शाहूनगरसह हौसिंग सोसायटी, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, दत्त कॉलनी, खान्देश मिल कॉलनी या भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विनायकराव जोशी यांच्या आशीर्वचनांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यांनी यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शक मंत्र दिले. हर्षदा अशोक जिवडे हिने पसायदान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजदीप प्रकाश पाटील यांनी मानले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप चौधरी, हितेंद्र टेकावडे, मयूर मुळीक, कैलास पाटील यांच्यासह हिंदू प्रेमी तरुणांनी विशेष सहकार्य केले.



