
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तिरळेपणा (Squint) आणि पडलेली पापणी (Ptosis) या डोळ्यांच्या आजारांवर मोफत तपासणी व शस्त्रक्रियेचे विशेष शिबिर आजपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुरू झाले आहे. या शिबिरामुळे रुग्णांना आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नसून, जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या शिबिरात उद्या (१ एप्रिल) व परवा (२ एप्रिल) तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर ३ ते ५ एप्रिल दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या नेतृत्वाखालील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ३ एप्रिल रोजी जळगावात दाखल होणार असून ते स्वतः शस्त्रक्रिया करणार आहेत.
डॉ. झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून त्यांनी ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या टीमची कामगिरी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससह आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोंदली गेली आहे. त्यामुळे जळगावातील रुग्णांना अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश ‘तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा’ हा असून, तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जळगाव व परिसरातील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात असून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला केवळ १०० रुग्णांसाठी नोंदणी मर्यादित ठेवण्यात आली होती, मात्र आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक रुग्णांनी नोंदणी केली आहे. तरीही इच्छुकांनी तात्काळ नोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास व जेवणाची मोफत व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ७०२८३०३४२३ / ९१७५८३००७५ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मधुसूदन झंवर यांनी सांगितले की, राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये १९८ शिबिरे यशस्वीपणे पार पडली असली तरी जळगावाबद्दल विशेष आकर्षण होते. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाने जळगावकरांची सेवा करण्याची संधी दिली, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आम्हीही जळगावकरांच्या सेवेसाठी उत्सुक आहोत, असे त्यांनी नमूद केले.



