नवी दिल्ली-वृत्तसेवा । देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच EPFO 3.0 प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या सिस्टिममुळे PF खाते अधिक डिजिटल, सुलभ आणि बँक खात्यासारखे कार्यक्षम होणार असून कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI द्वारे PF रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
सध्या PF खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ मानली जाते. कागदी प्रक्रिया, नियोक्त्याची मंजुरी आणि क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र EPFO 3.0 अंतर्गत कोर-बँकिंग आधारित डिजिटल प्रणाली विकसित केली जात असून, यामुळे PF बॅलेन्स त्वरित तपासता येईल, ऑनलाईन क्लेम दाखल करता येईल आणि पैसे अल्पावधीत खात्यात जमा होतील.

या नव्या प्रणालीतील सर्वात मोठा बदल म्हणजे PF रक्कम ATM कार्ड आणि UPI च्या माध्यमातून काढण्याची सुविधा. आरोग्य, घर खरेदी, शिक्षण किंवा बेरोजगारी यांसारख्या वैध कारणांसाठी नियमांच्या चौकटीत PF रक्कम सहजपणे काढता येणार आहे. यामुळे क्लेम सेटलमेंट प्रक्रिया अधिक वेगवान होणार असून, आधार आणि KYC पडताळणीच्या आधारे क्लेम ऑटोमॅटिक पद्धतीने पूर्ण होईल. त्यामुळे आठवड्याभराची प्रतीक्षा आता काही दिवसांवर येण्याची शक्यता आहे.
याशिवाय, नोकरी बदलल्यानंतर PF खाते हस्तांतरणाची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत हे हस्तांतरण स्वयंचलित पद्धतीने होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वारंवार अर्ज करण्याची गरज भासणार नाही. या बदलामुळे कर्मचारी वर्गासाठी PF व्यवस्थापन अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या सुविधांमुळे PF वापर अधिक सोपा झाला असला तरी जबाबदारीही वाढणार आहे. PF ही निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता मानली जाते, त्यामुळे अनावश्यक किंवा वारंवार पैसे काढणे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा वापर विवेकाने करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.



