जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून रॅगींग करणे हा गंभीर गुन्हा असल्याचा इशारा अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी दिला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित संयुक्त सभेत त्यांनी विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या रॅगींग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेत विद्यार्थ्यांना कायदेशीर तरतुदी, त्याचे परिणाम आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगींग म्हणजे काय, त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम काय होतात याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगींगपासून दूर राहण्याचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.

यानंतर अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आदराने वागणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयात रॅगींग सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. रॅगींगमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते आणि त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात, असेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनीही विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाबाबत माहिती देत महाविद्यालयाचा परिसर पूर्णपणे रॅगींगमुक्त ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत रॅगींग विरोधी प्रतिज्ञा घेतली.
या सभेला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. सी. डी. सारंग, रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे, प्रा. शैलेश राणे, विद्यार्थी सचिव शिवराज दाभाडे, स्वराज सुर्या यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



