जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समतानगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, दादाराव राठोड यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यंदाच्या जयंती उत्सवाचे नियोजन भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
समतानगर येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान नगरसेवक अनिल अडकमोल यांनी भूषविले. समता समाज मंडळाच्या वतीने आयोजित या बैठकीत परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. जयंती उत्सव अधिक प्रभावी आणि समाजाभिमुख व्हावा, यासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

या वेळी समितीच्या अध्यक्षपदी दादाराव राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी रवि सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रताप बनसोडे आणि खजिनदारपदी मुकेश टिल्लोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.
बैठकीस राजेश साळुंखे, हरीश शिंदे, बबलू शिंदे, भीमराव सोनवणे, सचिन अडकमोल, शांताराम सुरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या एकमताने ही निवड प्रक्रिया शांततेत आणि एकजुटीच्या वातावरणात पूर्ण करण्यात आली.
यंदाच्या जयंती उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, समाजात एकात्मता आणि विचारजागृतीचा संदेश देण्यावर भर दिला जाणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



