Home Cities यावल यावल नगरपरिषद हद्दीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाला हिरवा कंदील ; ९५ लाखांचा निधी...

यावल नगरपरिषद हद्दीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाला हिरवा कंदील ; ९५ लाखांचा निधी मंजूर


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून, नगरपरिषद हद्दीत अत्याधुनिक ‘नमो उद्यान’ विकसित करण्याच्या प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९५ लाख २८ हजार ५७ रुपये खर्चास मंजुरी मिळाल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

मुख्याधिकारी, नगरपरिषद यावल यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत शहरात एक उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ७२१ व ७१५ येथे ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने मूळतः एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र ई-निविदा प्रक्रियेनंतर अंतिम मंजुरी ९५.२८ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

या प्रकल्पाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून यावल नगरपरिषद कार्यरत राहणार असून, निधी प्राप्त झाल्याशिवाय कामाचा कार्यादेश देऊ नये, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच प्रकल्पाचा १०० टक्के खर्च राज्य शासनाकडून केला जाणार असल्यामुळे सर्व कामे निर्धारित मर्यादेत आणि नियमांनुसार पार पाडण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ई-निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्प खर्च कमी झाल्यास उर्वरित रक्कम शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेकडे असेल, तर अतिरिक्त खर्च झाल्यास तो संबंधित यंत्रणेला उचलावा लागणार आहे.

या ‘नमो उद्यान’ प्रकल्पामुळे यावल शहरात हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, नागरिकांना विरंगुळा व आरोग्यदायी वातावरण मिळणार आहे. विशेषतः लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांचा समावेश असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound