Home Cities जळगाव जळगावातून बार कौन्सिल निवडणुकीत इतिहासाची संधी; ॲड. रेखा कोचुरे पहिल्या महिला उमेदवार

जळगावातून बार कौन्सिल निवडणुकीत इतिहासाची संधी; ॲड. रेखा कोचुरे पहिल्या महिला उमेदवार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीसाठी उद्या (दि. २४ मार्च) मतदान पार पडणार असून, जळगाव शहरातून यंदा इतिहास घडविण्याची संधी निर्माण झाली आहे. या निवडणुकीत ॲड. रेखा घनश्याम कोचुरे या पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत, ज्यामुळे वकिल समुदायाचे विशेष लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

जळगाव शहरातून या निवडणुकीत ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि ॲड. रेखा घनश्याम कोचुरे हे दोन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापूर्वी ॲड. एल. एल. बेंडाळे आणि ॲड. भरत देशमुख यांसारख्या दिग्गजांनी बार कौन्सिलवर प्रतिनिधित्व केले असले, तरी जळगाव न्यायालयातून महिला उमेदवार कधीच पुढे आली नव्हती. त्यामुळे कोचुरे यांच्या उमेदवारीकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहिले जात आहे.

या निवडणुकीत एकूण २३ सदस्यांची निवड होणार असून, त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय २ महिला को-ऑप्ट सदस्यांची निवड नंतर करण्यात येणार आहे, ज्यामुळे एकूण सदस्यसंख्या २५ होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

ॲड. रेखा घनश्याम कोचुरे या विजयी झाल्यास त्या खानदेशातून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवावर निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला सदस्य ठरतील आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला जाईल. या शक्यतेमुळे केवळ जळगावच नव्हे, तर संपूर्ण खानदेशातील वकिल वर्गाचे लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झाले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने वकिल संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा टप्पा निर्णायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पारंपरिक पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांची वाढती उपस्थिती ही सकारात्मक बदलाची नांदी मानली जात आहे.

 


Protected Content

Play sound