Home उद्योग महिला उद्योजकांना मोठी संधी; जळगावात ‘अमृत बाजारपेठ’ २ दिवस रंगणार

महिला उद्योजकांना मोठी संधी; जळगावात ‘अमृत बाजारपेठ’ २ दिवस रंगणार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी देण्यासाठी ‘अमृत थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन २१ व २२ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (AMRUT) या संस्थेच्या वतीने होणाऱ्या या उपक्रमामुळे जळगावकरांना दर्जेदार स्वदेशी वस्तू खरेदीची अनोखी संधी मिळणार आहे.

या बाजारपेठेत एकूण ३६ स्टॉल उभारण्यात येणार असून त्यापैकी ३० हून अधिक स्टॉल महिला उद्योजकांचे असणार आहेत. त्यामुळे महिलांना व्यवसायाच्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करता येणार असल्याने गुणवत्ता आणि योग्य दर यांचा समतोल राखला जाणार आहे.

या उपक्रमात मसाले, रेडी फूड, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड वस्तू, साड्या, आयुर्वेदिक उत्पादने, पापड, वाळवण यांसारख्या विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तसेच तांबूलपान, खापरवरील पुरणपोळी आणि गरमागरम जेवणाचे स्टॉलही खवय्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे ही बाजारपेठ केवळ खरेदीपुरती मर्यादित न राहता एक उत्सवी अनुभव देणारी ठरणार आहे.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे स्वदेशी उत्पादनांना चालना देणे, स्थानिक उद्योजकांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना थेट दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणे हा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या बाजारपेठेला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound