Home Cities जळगाव जळगावात गुढीपाडव्याची जल्लोषात शोभायात्रा; ढोल-लेझीमने रंगला नववर्षाचा उत्सव

जळगावात गुढीपाडव्याची जल्लोषात शोभायात्रा; ढोल-लेझीमने रंगला नववर्षाचा उत्सव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जळगाव शहरात केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला गुढीपूजनाने उत्साहात प्रारंभ झाला. पारंपरिक संस्कृती, देशभक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही शोभायात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर दीपमाला काळे, नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, माजी नगरसेविका पार्वताबाई गीत, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव दिलीप चोपडा, जिजामाता विद्यालयाचे चेअरमन बापू महाले, माजी महापौर सीमा भोळे, राष्ट्रसेविका समितीच्या कांचन साने तसेच प्रकल्प प्रमुख मनीषा खडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विधिवत गुढीपूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

शोभायात्रेत विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. जिजामाता विद्यालयाच्या लेझीम पथकाने तालबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली, तर राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी लाठी-काठीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून शौर्य आणि आत्मसंरक्षणाचा संदेश दिला. महिलांच्या ढोल पथकाने आपल्या दमदार तालांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

याशिवाय, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वेशभूषेत सहभागी होत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे जिवंत दर्शन घडवले. वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला क्रांतिकारकांचा सजीव देखावा हा शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरला.

शोभायात्रेच्या मार्गावर परिसरातील नागरिकांनी सुंदर रांगोळ्या काढून आणि विविध प्रकारे स्वागत करत उत्साहात सहभाग नोंदवला. वाघ नगर येथून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा हरिविठ्ठल नगर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली.

 


Protected Content

Play sound