Home आरोग्य मोबाईलवर बोलताना पडून मणक्याला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणीला नवजीवन

मोबाईलवर बोलताना पडून मणक्याला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तरुणीला नवजीवन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मोबाईलवर बोलत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय तरुणीच्या मणक्यावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे काही दिवसांपूर्वी चालण्याची क्षमता गमावलेल्या या तरुणीला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहून चालता येऊ लागले आहे. मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या या उपचारामुळे रुग्ण आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावल तालुक्यातील आफरीन तडवी ही २० वर्षीय तरुणी आपल्या घरी मोबाईलवर बोलत असताना अचानक तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. या अपघातात तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. पडताना झालेल्या तीव्र आघातामुळे तिच्या पायातील ताकद अचानक कमी झाली आणि ती उभी राहू शकत नव्हती. कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपुल राठोड यांनी तिची सखोल तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर तिला एमआरआयसह विविध अत्याधुनिक तपासण्या करण्यात आल्या. एमआरआय अहवालातून तिच्या मणक्याच्या कंबरेजवळील भागात गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. मणक्याच्या एल-२ आणि एल-३ या मणक्यांमध्ये गंभीर दुखापत होऊन मज्जातंतूंवर दबाव निर्माण झाला होता. यामुळेच तिच्या पायातील ताकद कमी झाली होती.

रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एल-२ ते एल-३ लॅमिनोक्टोमी आणि एल-२ ते एल-४ पेडीकल स्क्रू फिक्सेशन ही अत्यंत नाजूक आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मणक्यावरील दबाव कमी करून तुटलेल्या मणक्यांना स्क्रू आणि रॉडच्या सहाय्याने स्थिर करण्यात आले. ही शस्त्रक्रिया मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपुल राठोड, डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे तसेच भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे यांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर अतिदक्षता विभागात विशेष लक्ष ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार आणि फिजिओथेरपी सुरू ठेवण्यात आली. अवघ्या आठवडाभरात तिच्या पायातील ताकद हळूहळू परत येऊ लागली. काही दिवसांतच ती स्वतःच्या पायावर उभी राहू लागली आणि चालण्यासही सक्षम झाली. या यशस्वी उपचारामुळे रुग्ण आणि तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

या संपूर्ण उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात आल्याने रुग्णाला उपचार पूर्णपणे मोफत मिळाले. आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबासाठी ही योजना मोठा दिलासा ठरल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मणक्याच्या दुखापतीबाबत बोलताना डॉ. प्रितम दास यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या दुखापतीत वेळेवर योग्य निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या रुग्णाच्या बाबतीत वेळेत उपचार मिळाल्यामुळे मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात यश आले आणि तिच्या पायातील ताकद पुन्हा पूर्ववत होऊ शकली. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अशा दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound