
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोविड-१९ महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कंत्राटी कोविड योद्ध्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली आहे. कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देत सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

८ मार्च २०२६ रोजी कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन कोविड काळात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तसेच कामगार मंत्री यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करून कोविड योद्ध्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. या वेळी निलेश बोरा, युवराज सुरवाडे, यश कुमावत, विनोद सपकाळे, बबन सावळे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कोविड-१९ काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक ७ एप्रिल २०२६ रोजी पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोविड कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीचे आयोजन माजी कोविड कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. बैठकीत अनेक कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव आणि सध्याच्या अडचणी मांडत शासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीत युवराज सुरवाडे यांनी मार्गदर्शन करत कोविड काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली लढाई एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. ही लढाई केवळ एका व्यक्तीची नसून सर्व कोविड योद्ध्यांची आहे आणि त्यासाठी सर्वांनी संघटित राहून आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा लढा नेण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सूचकपणे नमूद केले.
निलेश बोरा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, कोविड महामारीच्या कठीण काळात अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. त्या काळातील त्यांच्या योगदानाची दखल घेत शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौर आणि उपमहापौर यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून तेही या विषयावर महानगरपालिकेत आपली भूमिका मांडतील, असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी ठेकेदारी पद्धतीत काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. शासकीय रुग्णालयात काम करताना ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडासारख्या हक्काच्या रकमेबाबतही अनियमितता होत असल्याची तक्रार करण्यात आली. यश कुमावत या कर्मचाऱ्याने या संदर्भात आपली व्यथा मांडत यावर शासनाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली.
या चर्चेनंतर पुढील काळात कोविड योद्ध्यांच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने धरणे, आंदोलने आणि संघटित लढा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या वेळी वाल्मीक सपकाळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि संघटितपणे प्रयत्न केल्यास नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीला मोठ्या संख्येने कोविड कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश वानखेडे, विनोद सपकाळे, संतोष ताडे, बबन सावळे, भूषण पाटील, लक्ष्मण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार युवराज सुरवाडे यांनी मानले.
कोविड महामारीच्या काळात केलेल्या सेवेला योग्य न्याय मिळावा आणि प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी कोविड योद्ध्यांनी पुन्हा एकदा संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून लवकरच ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



