
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढत शिवरायांना अभिवादन केले. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे शिवचरित्राचे स्मरण करून कार्यक्रमाला ऐतिहासिक वातावरणाची रंगत आणली.

६ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून लेझीम पथकाच्या तालावर आकर्षक सादरीकरणे केली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण मिरवणूक काढत शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला.
मिरवणुकीदरम्यान प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले. या पथनाट्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने शिवपाळणा व जन्मोत्सव सोहळा पार पडला.
कार्यक्रमात निधी बैसाणे, ऋतुजा ठेंग, उत्कर्षा राजपूत, प्रणाली मुसळे, चेतना सोनवणे, दिव्या भांडारकर, राजश्री यादव, चेतस पाटील आणि भावेश रावळकर या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे, नृत्य आणि प्रभावी वक्तृत्व सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून शिवरायांचे शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना जिवंत झाल्याचा अनुभव उपस्थितांना मिळाला.
यावेळी प्रा. डॉ. हेमंत इंगळे यांनी मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकीचे अद्वितीय उदाहरण असल्याचे सांगितले. त्यांच्या स्थापत्यकलेत रणनीती, संरक्षण व्यवस्था आणि तांत्रिक कौशल्य यांचा अद्भुत संगम दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात शिवचरित्राचा वेध घेत युवकांनी शिवरायांचे नेतृत्वगुण, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीचे उदाहरण देत प्रशासनातील शिस्त, नियोजन आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात उत्कृष्ट वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये चेतना सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दिव्या भांडारकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नकुल गाडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मोहित चौधरी, गौरव इंगळे आणि साक्षी घोडके यांनी केले.
या कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण करणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.



