
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दहिगाव परिसरात कांदा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच शेतकऱ्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा पिकाच्या विक्रीसाठी मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दहिगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाखेत कांदा खरेदी केंद्राचा शुभारंभ दि. ५ मार्च रोजी करण्यात आला. गावातील प्रगतशील शेतकरी राजू पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, विद्यमान संचालक तथा माजी सभापती राकेश फेगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सभापती राकेश फेगडे यांच्या कार्यकाळात दहिगाव येथील कोरपावली रस्त्यावर पाच एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. या जागेचे सपाटीकरण करून येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा सुरू करण्याची योजना राबविण्यात आली. या निर्णयामुळे दहिगाव तसेच आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
दहिगाव परिसरातील सावखेडा सिम, कोरपावली, मोहराळा, हरिपुरा, महलखेडी, विरावली या गावांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याच्या विक्रीसाठी पूर्वी दूरच्या बाजारात जावे लागत होते. आता दहिगाव येथेच कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यांची बचत होणार आहे. तसेच उपबाजार समितीत बाजार समितीच्या मालकीचा तोल काटा उभारण्यात यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.
उद्घाटन कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत यांनी सांगितले की, दहिगाव येथे बाजार समितीची शाखा सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे बाजार समितीचे कर्तव्य असून त्या दिशेने ही शाखा महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला संचालक हर्षल पाटील, बबलू कोळी, पंकज चौधरी, अशोक चौधरी, देविदास पाटील, प्रेमराज चौधरी, कमलाकर पाटील, संजीव राजपूत, मिलिंद कोळी, हेमराज चौधरी, सचिव सोनवणे, योगेश चौधरी, सरपंच अजय अडकमोल, नंदकिशोर बारी, ज्ञानेश्वर महाजन, योगेश भंगाळे, प्रभु जाधव यांच्यासह व्यापारी म्हणून किशोर पाटील, भरत चौधरी, फारूक पिंजारी, संतोष चौधरी, कैलास चौधरी, फारूक शेठ, अजू शेठ किनगाव, किशोर तायडे, अमोल जैन, अरुण पाटील आदींची उपस्थिती होती. तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दहिगाव येथे सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्रामुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



