Home Cities जळगाव ‘शाळा ओसाड नकोत, गजबजलेल्या हव्यात’; महापौर दीपमाला काळे यांची स्पष्ट भूमिका

‘शाळा ओसाड नकोत, गजबजलेल्या हव्यात’; महापौर दीपमाला काळे यांची स्पष्ट भूमिका


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात प्रशासनाला गती दिली असून महापालिका शाळांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी, २ मार्च रोजी त्यांनी शिक्षण विभागाची पहिली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेत शहरातील शाळांची सद्यस्थिती जाणून घेतली आणि लवकरच सर्वसमावेशक ‘कृती कार्यक्रम’ जाहीर करण्याचा इशारा दिला.

महानगरपालिकेतर्फे शहरात चालवल्या जाणाऱ्या अनेक शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचे चित्र बैठकीत समोर आले. काही शाळांच्या इमारतींची पडझड झालेली आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या अत्यल्प असल्याने शाळा ओसाड असल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर “शाळा ओसाड पडायला नकोत, त्या गजबजलेल्या असायला हव्या,” असे मत महापौरांनी व्यक्त केले. पुढील आठवड्यात सविस्तर बैठक घेऊन प्रत्येक शाळेची अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पालकांशी थेट संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज महापौरांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. मुलांना शाळेची गोडी लागावी, यासाठी नवकल्पनांवर आधारित ‘ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’चा अवलंब करण्याचा विचारही मांडण्यात आला.

शिक्षकांचा दर्जा आणि अध्यापनाची गुणवत्ता उंचावण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रस्ताव पुढे आला. याशिवाय शालेय पोषण आहार योजनेची सद्यस्थिती काय आहे, त्यात काही त्रुटी आहेत का, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

या बैठकीस शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी खलील शेख, मुख्याध्यापक सचिन बोरसे, मनीषा सूर्यवंशी, वर्षा पगारे तसेच विभागातील इतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी महापौरांच्या सूचनांनुसार शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपल्या शाळा ओसाड पडायला नकोत. मुले शाळेत येण्यासाठी आपल्याला पालकांना विश्वासात घ्यावे लागेल. शाळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण लवकरच कृती कार्यक्रम ठरवूया. शिक्षण विभागाने पुढील बैठकीत सर्व सूचना आणि आवश्यक माहितींसह तयार राहावे.” त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिका शाळांच्या उन्नतीसाठी प्रशासन अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 


Protected Content

Play sound