
फैजपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पोलीस स्टेशनला तक्रार का केली? या जुन्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाल्याची घटना रावेर तालुक्यातील म्हैसवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्राताबाई अर्जुन सपकाळे (वय ६५, रा. सावदा रेल्वे स्टेशन) या म्हैसवाडी येथे गेल्या होत्या. यावेळी आरोपी अमर राजू मोरे आणि अनिता राजू मोरे (दोन्ही रा. आंबेडकर नगर, म्हैसवाडी) यांनी महिलेला गाठले. “तुम्ही अमोल विनोद पांडव याच्या विरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार का केली?” असा जाब विचारत आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका वाढला की, संशयित आरोपी यांनी विश्राताबाई आणि त्यांच्या सोबत असलेल्या रंजना साजन पांडव यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. रागाच्या भरात चाकूने हल्ला करून रंजना पांडव यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत केली. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना १ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास पांडुरंग पंडित पांडव यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी विश्राताबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख हे करीत आहे.



