जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी आज, शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेत शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका सिंधुताई कोल्हे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. एकमेव वैध अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निर्विवाद ठरली असून शहरातील महिला व बालविकासाच्या कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेत आयोजित विशेष सभेस महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला सभापतीपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. पीठासन अधिकारी मीनल करणवाल यांनी सिंधुताई कोल्हे यांचा दाखल केलेला अर्ज वैध ठरवून त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

पदभार स्वीकारल्यानंतर सिंधुताई कोल्हे यांनी शहरातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिक प्रोत्साहन देण्यात येईल, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील तसेच गरजू महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या तिन्ही घटकांवर लक्ष केंद्रित करून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, दीपक सूर्यवंशी, पूजा जगताप, गायत्री राणे, प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या सभापतींना शुभेच्छा देत महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला.



