Home क्रीडा भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिलला ‘लेडीज इक्वॅलिटी रन’

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिलला ‘लेडीज इक्वॅलिटी रन’


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यंदाही भुसावळमध्ये महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारी ‘लेडीज इक्वॅलिटी रन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिल रोजी होणाऱ्या या विशेष धावस्पर्धेत शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या संदर्भात असोसिएशनच्या नियमित धावपटूंची बैठक डॉ. चारुलता पाटील व डॉ. तुषार पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. मार्च महिन्यात शालेय परीक्षा असल्याने विद्यार्थिनी व त्यांच्या कुटुंबातील महिलांना सहभागी होण्यास अडचण येते. तसेच महिला दिनानिमित्त विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने अधिकाधिक महिलांना संधी मिळावी या उद्देशाने स्पर्धा एप्रिल महिन्यात घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांनी दिली.

या स्पर्धेच्या समन्वयक म्हणून डॉ. निलीमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदा नावनोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच १०० हून अधिक महिलांनी नोंदणी केल्याची माहिती प्रविण पाटील यांनी दिली.

स्पर्धा ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला स्पर्धेच्या आदल्या दिवशी टी-शर्ट देण्यात येईल. धाव पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिलेला पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. ५ व १० किमी गटातील धाव ही टायमिंग रन असणार असून आरएफआयडी प्रणालीद्वारे प्रत्येक धावपटूला स्वतंत्र बिब क्रमांक देण्यात येईल. धाव पूर्ण झाल्यानंतर संबंधित स्पर्धकाच्या मोबाईलवर तिच्या वेळेचा संदेश पाठविला जाईल. विजेत्यांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येतील, तर इतर स्पर्धकांसाठी लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

धावपटूंच्या सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक व खाद्यपदार्थांची व्यवस्था स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहे. मैदानावर सर्व सहभागींसाठी नाश्त्याचीही सोय असेल. प्रत्येक महिलेची धाव सुरक्षित, आनंददायी व दुखापतीशिवाय पूर्ण व्हावी या उद्देशाने मंगळवार, गुरुवार व रविवार सकाळी ६ ते ७ या वेळेत कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत प्रशिक्षण व सराव सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. एकूण १५ सराव सत्रे पूर्णपणे मोफत असतील आणि त्यास ३ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

बैठकीस गणसिंग पाटील, प्रशांत चौधरी, प्रशांत वंजारी, संजय तिवारी, नीलकंठ नेमाडे, प्रमोद शुक्ला, संजय चौधरी यांच्यासह असोसिएशनचे पुरुष धावपटू व सर्व नियमित महिला धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि समानतेचा संदेश देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Protected Content

Play sound