Home Cities जळगाव डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी स्थायी समिती सभापती पदाचा स्वीकारला पदभार

डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी स्थायी समिती सभापती पदाचा स्वीकारला पदभार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आयोजित विशेष सभेत भारतीय जनता पक्षाचे डॉ. चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने डॉ. पाटील यांची निवड निर्विवाद ठरली असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

सभेत स्थायी समिती सभापती पदासाठी केवळ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचाच अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची गरज भासली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही निवड पक्षासाठी आणि शहरासाठी सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

नवनिर्वाचित सभापती डॉ. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना जळगावकरांना अधिकाधिक मूलभूत सुविधा देण्याचा संकल्प व्यक्त केला. शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटारी योजना आणि होऊ घातलेली ई-बस सेवा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प स्थायी समितीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून काम करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मनपा अर्थसंकल्पाच्या नियोजनात शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण समितीमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्राधान्य राहील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. शहरातील उत्पन्नाचे विविध स्रोत वाढवून आर्थिक स्वावलंबन साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून प्रलंबित व्यापारी गाळ्यांचा प्रश्न वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी नव्या सभापतींना शुभेच्छा देत विकासकामांना वेग देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 


Protected Content

Play sound