जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत तातडीने सुधारणा घडवून आणण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासकीय यंत्रणेसह कंत्राटदार कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. जळगाव महानगरपालिका स्वच्छतेवर दरमहा सुमारे अंदाजित पाऊने तीन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरात अपेक्षित स्वच्छता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आरोग्य सहउपायुक्त उदय पाटील, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनीचे सुपरवायझर यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत उपमहापौरांनी कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बीव्हीजी कंपनीकडे सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध असूनही अनेक प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. उपमहापौरांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीतही अनेक ठिकाणी अस्वच्छता कायम असल्याचे आणि प्रभागनिहाय कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावेळी बोलताना उपमहापौर म्हणाले की, बीव्हीजी कंपनीकडून करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार कामकाज होत नाही. करारनाम्यात नमूद असलेल्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करणे कंपनीला बंधनकारक आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. ही कंपनीला देण्यात येत असलेली अंतिम समज असून, शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमित आणि दर्जेदार साफसफाई तात्काळ सुरू होणे अपेक्षित आहे.
येणाऱ्या काळात स्वच्छतेच्या कामात सुधारणा न झाल्यास करारनाम्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच पुढील कठोर प्रशासकीय निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. जळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.



