Home मनोरंजन हृदयविकाराच्या झटक्याच्या अफवांवर पूर्णविराम; संजय लीला भन्साळी पूर्णपणे स्वस्थ

हृदयविकाराच्या झटक्याच्या अफवांवर पूर्णविराम; संजय लीला भन्साळी पूर्णपणे स्वस्थ


मुंबई-वृत्तसेवा ।  प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवांनी बुधवारी सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली. वाढदिवसानंतर अवघ्या एका दिवसात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या टीमने तातडीने अधिकृत निवेदन जारी करत या सर्व बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले असून भन्साळी पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगितले आहे.

बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर भन्साळी यांच्या प्रकृतीबाबत विविध पोस्ट आणि संदेश व्हायरल होऊ लागले. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे २४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी आपला ६३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे वाढदिवसानंतर अचानक प्रकृती खालावल्याच्या बातम्यांनी चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व चर्चांनंतर भन्साळी यांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत वस्तुस्थिती स्पष्ट केली. “भन्साळी सर पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही हृदयविकाराचा झटका आलेला नाही आणि त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आलेले नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासण्याचे आवाहनही करण्यात आले.

सध्या भन्साळी हे त्यांच्या आगामी महत्त्वाकांक्षी लव्ह अँड वॉर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या तिघांची जोडी आणि भन्साळी यांचे भव्य दिग्दर्शन यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी विश्रांती न घेता चित्रपटाच्या सेटवर उपस्थित राहून कामाला प्राधान्य दिले होते.

भन्साळी यांच्या चित्रपटांची ओळख म्हणजे भव्यता, उत्कृष्ट संगीत, समृद्ध वेशभूषा आणि प्रभावी दृश्यरचना. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच वेगळा अनुभव दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाकडूनही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

 


Protected Content

Play sound