Home Cities जळगाव भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर धडकणार महामोर्चा

भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर धडकणार महामोर्चा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संविधानिक अधिकारांचे संरक्षण, जातीनिहाय जनगणना आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

या आंदोलनाची पार्श्वभूमी डिसेंबर २०२५ मधील एका घटनेशी जोडलेली आहे. २६ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान ओडिशामधील कटक येथे बामसेफचे ४२ वे आणि भारत मुक्ती मोर्चाचे १५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी प्रशासनाने सुरुवातीला सर्व परवानग्या दिल्या होत्या आणि संघटनेने मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून तयारीही पूर्ण केली होती. मात्र, ऐनवेळी स्थानिक दबावामुळे प्रशासनाने या परवानग्या रद्द केल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. हा प्रकार संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या अन्यायाचा निषेध करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी चार टप्प्यांत आंदोलन जाहीर केले होते. नागपुरातील हा महामोर्चा याच आंदोलनाचा अंतिम आणि निर्णायक टप्पा मानला जात आहे. या आंदोलनाला बहुजन समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि कामगार संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

हा महामोर्चा नागपूरमधील इंदौरा चौकातून सुरू होऊन संघाच्या महाल येथील मुख्यालयावर समारोप होणार आहे. संविधान, लोकशाही आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार वाचवण्यासाठी हा लढा पुकारण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाद्वारे ओबीसीसह सर्व घटकांची जातीनिहाय जनगणना करावी, ईव्हीएमऐजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, ओडिशामधील अधिवेशनास पुन्हा परवानगी द्यावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशा प्रमुख मागण्या सरकारकडे मांडण्यात येणार आहेत.

वामन मेश्राम यांच्यासह राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे नेते चौधरी विकास पटेल या महामोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. संपूर्ण देशभरातून बहुजन समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असून, हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पार पडेल, असेही भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, जळगाव जिल्हा प्रभारी सुनिल देहडे यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound