जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘स्मार्ट सर्व्हिसेस, पुणे’ या कंपनीमार्फत नियुक्त असलेल्या या कर्मचाऱ्यांनी अखेर आर्थिक अडचणींना कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
शासकीय आयुर्वेद रुग्णालयात वर्ग ३ (लिपिक) आणि वर्ग ४ श्रेणीतील कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर आपली सेवा बजावत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या हक्काचे वेतन वेळेवर मिळत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे तब्बल तीन महिन्यांचे, तर वर्ग ३ कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कामावर प्रामाणिकपणे हजर राहूनही मोबदला मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला असून, कुटुंबाचा दैनंदिन खर्च, घरभाडे आणि मुलांच्या शिक्षणाचे शुल्क भरणेही आता कठीण झाले आहे.

वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात ११ आणि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित कंपनीला अधिकृत ईमेल पाठवून वेतनाची मागणी करण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही की कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. कंपनीच्या या आडमुठ्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी आपल्या तक्रारीसोबत ईमेलचे पुरावेही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
शासकीय रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णसेवा देऊनही वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, कंपनीला थकीत वेतन देण्याचे आदेश द्यावेत आणि वारंवार होणाऱ्या या दिरंगाईबद्दल संबंधित कंपनीवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.



