Home Uncategorized महापौरांकडे चौक नूतनीकरणाची नितीन लढ्ढा यांची मागणी

महापौरांकडे चौक नूतनीकरणाची नितीन लढ्ढा यांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन स्वागतार्ह असले तरी, शहरातील मुख्य चौकांची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी महापौर दीपमाला काळे यांना पत्र पाठवून शहरातील प्रमुख ११ चौकांच्या तातडीने सुशोभीकरणाची मागणी केली आहे. १२ फेब्रुवारी रोजी आयुक्तांच्या दालनात होणाऱ्या आढावा बैठकीत या विषयावर गांभीर्याने विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

नितीन लढ्ढा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विविध संस्थांच्या माध्यमातून शहरात दुभाजक विकसित करण्याचे काम समाधानकारक रित्या सुरू असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. मात्र, केवळ दुभाजक महत्त्वाचे नसून शहरातील मध्यवर्ती भागातील चौक हे शहराचे प्रतिबिंब असतात. सध्या लाल बहादूर शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, कोंबडी बाजार, पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका, अजिंठा चौक, इच्छादेवी, आकाशवाणी, ख्वॉजामियाँ चौक, कोर्ट चौक आणि पांडे डेअरी चौक यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या चौकांची दुरवस्था झालेली आहे.

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी या प्रमुख चौकांचे नूतनीकरण होणे काळाची गरज आहे. हे काम लोकसहभागातून किंवा महानगरपालिकेच्या निधीतून तातडीने मार्गी लावावे, अशी विनंती लढ्ढा यांनी केली आहे. उद्या होणाऱ्या आढावा बैठकीत या ११ चौकांच्या सुशोभीकरणाबाबत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यास जळगाव शहराच्या वैभवात मोठी भर पडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे


Protected Content

Play sound