रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथे एका व्यसनी पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पतीने केवळ मुलाला वाचवण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून पत्नीवर लोखंडी मुसळीने प्रहार केला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुस्कान फिरोज तडवी (वय २३ वर्षे) या आपल्या पतीसोबत पाल येथे राहतात. २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पती फिरोज गफुर तडवी हा दारू पिऊन घरी आला आणि लहान मुलाला विनाकारण मारहाण करू लागला. मुलाला वाचवण्यासाठी मुस्कान तडवी धावून गेल्या असता, फिरोजचा राग अनावर झाला. रागाच्या भरात फिरोजने मुस्कान यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. इतक्यावरच न थांबता त्याने मुस्कान यांच्या उजव्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतला. त्यानंतर घरातील लोखंडी मुसळी उचलून मुस्कान यांच्या डोक्यावर आणि अंगावर जोरात मारून त्यांना गंभीर जखमी केले. “तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.

पोलीस कारवाई जखमी अवस्थेत मुस्कान तडवी यांनी रावेर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी फिरोज तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



