Home धर्म-समाज पारोळ्यात धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात; पालखी मिरवणुकीने दुमदुमले शहर

पारोळ्यात धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात; पालखी मिरवणुकीने दुमदुमले शहर


पारोळा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील नाथ जोगी समाजातर्फे आराध्य दैवत श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या स्मरणात ‘धर्मनाथ बीज’ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाच्या सुरुवातीला श्री गोरक्षनाथ महाराजांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले. याप्रसंगी नाथांच्या दोह्यांचे गायन करून सत्संग करण्यात आला. त्यानंतर ‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथातील ३४ व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. समाज अध्यक्ष जितेंद्र जोगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला शहराचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष रोहन मोरे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थिती लावली. यावेळी जोगी समाजाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. रात्रीच्या वेळी जोगी समाज बांधव आणि महिला मंडळाच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

पालखीमध्ये श्री नवनाथ ग्रंथसाहेब, श्री नवनाथांचा फोटो आणि श्री गोरक्षनाथ महाराजांची मूर्ती विराजमान होती. ही मिरवणूक मुख्य रस्ता, साई मंदिर आणि गुजराथी गल्लीमार्गे निघाली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक गुरू वाद्ये, भेर आणि सुगम वाद्यांच्या गजरात ‘नमो आदेश’च्या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला होता. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करून नाथांची आरती केली.

मिरवणुकीची सांगता जोगी समाज मंदिरात करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोगी समाजाचे अध्यक्ष जितेंद्र जोगी, उपाध्यक्ष भिकन जोगी, सचिव संतोष जोगी, खजिनदार ईश्वर जोगी, सल्लागार देविदास जोगी, वरिष्ठ सल्लागार वसंत जोगी तसेच पियुष जोगी, योगेश जोगी, मुकुल जोगी, अक्षद जोगी, आकाश जोगी, अविनाश जोगी, उमेश जोगी व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound