

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खेळ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो माणसात सांघिक भावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती रुजवतो. कुठलाही खेळ खेळताना संघभावना जपली गेली आणि खिलाडूवृत्ती जिवंत राहिली, तरच खऱ्या अर्थाने मने जिंकता येतात, असे प्रतिपादन उद्योजक अशोक जैन यांनी केले. श्री जैन युवा फाउंडेशन, जळगाव आयोजित बहुप्रतिक्षित ‘जेपीएल-१२’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जी.एस. ग्राउंड (शिवतीर्थ) येथे १८ डिसेंबर रोजी रात्री अत्यंत उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात या स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नयनतारा बाफना, आमदार राजुमामा भोळे, माजी आमदार मनीष जैन, व्यापारी अनिल व संजय देसर्डा, विजय बनवट आणि सिद्धार्थ बाफना यांची उपस्थिती लाभली. सर्व संघमालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बिगुल वाजवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात ‘नवकार मंत्र’ पठणाने करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजनाची जबाबदारी महिलांनी समर्थपणे सांभाळली होती. जैन युवा फाउंडेशनच्या बालचमूंनी सादर केलेल्या ‘गणेश वंदने’ने उपस्थितांची मने जिंकली, तर स्वाती जैन, प्रिया बांठिया, सलोनी ललवानी आणि श्रुती राका यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी कार्यक्रमात भक्तीरसाची रंगत भरली.
स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना मान्यवरांनी सांगितले की, ‘जेपीएल’सारख्या स्पर्धांमधून युवकांमध्ये खेळाविषयीची आवड वाढते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. क्रिकेट रसिकांसाठी या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘लाईव्ह व्हिजन’ या यूट्यूब चॅनेलवर करण्यात येत असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना ललवानी यांनी प्रभावीपणे केले. या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन रिकेश गांधी, सपना छोरिया आणि दीपा राका यांनी विशेष परिश्रम घेतले. मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार ऋषभ शाह यांनी मानले.
श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश छोरिया, प्रोजेक्ट चेअरमन रिकेश गांधी, अनिल सिसोदिया तसेच फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे, संघमालकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ‘जेपीएल-१२’ स्पर्धेमुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



