Home क्राईम तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टर चालक फरार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टर चालक फरार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
200

मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तापी नदीपात्रालगत अवैध गौणखनिज वाळू वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, शासकीय कारवाईदरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झाला तसेच तहसीलदारांना धमकावण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात फिर्यादी म्हणून तहसीलदार मुक्ताईनगर गिरीश रामेश्वर वखारे यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान तापी नदीपात्रालगत शासकीय पथकासह कारवाई करत असताना ट्रॅक्टर क्रमांक MH-19 AN 0535 मधील ट्रॉलीत अवैधरीत्या भरलेली गौण खनिज वाळू वाहून नेली जात असल्याचे आढळून आले. पथकाने सदर ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने वाहनासह पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर तहसीलदार वखारे हे पथकासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना आरोपी मुकेश धनगर यांचा काका, आरोपी संजय तुकाराम धनगर तेथे आला. त्याने स्वतःला तालुक्याच्या अँटी करप्शन संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगत ट्रॅक्टरवर कारवाई करू नये, अशी धमकी दिली आणि मोटारसायकलने घटनास्थळावरून निघून गेला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग 5 अंतर्गत CCTNS क्रमांक/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 62 तसेच महाराष्ट्र महसूल संहिता कलम 48(7), 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले ट्रॅक्टर MH-19 AN 0535 आणि हिरो सुपर स्प्लेंडर मोटारसायकल MH-19 DD 0779 अशी वाहने नमूद करण्यात आली असून, सुमारे 5 हजार 800 रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरीस गेल्याची नोंद आहे.

अवैध गौणखनिज चोरी व शासकीय कामात अडथळा आणण्याचा गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार राजकुमार चव्हाण करीत आहेत. फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली आहेत.


Protected Content

Play sound