Home Cities जळगाव जळगाव बाजार समितीचे कामकाज ठप्प; राज्यव्यापी बंदात व्यापाऱ्यांचा सहभाग

जळगाव बाजार समितीचे कामकाज ठप्प; राज्यव्यापी बंदात व्यापाऱ्यांचा सहभाग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यव्यापी व्यापारी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. व्यापाऱ्यांच्या या बंदामुळे बाजार समितीमधील दररोज होणारी सुमारे ५ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर आधीच जीएसटी लागू असताना, त्याचबरोबर बाजार समिती कर (सेस) आकारला जातो. हा बाजार समिती कर (सेस) पूर्णपणे रद्द करावा, तसेच ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जळगाव बाजार समितीमधील १०० च्या आसपास दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

या बंदमुळे आज राज्यभरातून जळगाव बाजार समितीत येणारा शेतमाल येऊ शकला नाही, तसेच बाजार समितीतून बाहेरील जिल्ह्यांमध्ये जाणारा माल देखील जागेवरच थांबला. परिणामी, शेतमाल वाहतूक आणि खरेदी-विक्रीची संपूर्ण साखळी खंडित झाली. व्यापाऱ्यांच्या या एकजुटीमुळे सरकारने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजार समितीचे कामकाज ठप्प झाल्याने शेतकरी आणि ग्राहकांनाही काही प्रमाणात फटका बसला आहे.


Protected Content

Play sound