नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात गेल्या काही वर्षांत वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आहे. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या घटना अधिक आहेत. मात्र, अलीकडच्या दोन वर्षात पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ माणसे मृत्युमुखी पडली. त्यापैकी ५५ टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत. केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून २९.५७ कोटी रुपये वितरित केले आहेत. २०२३ मध्ये भारतातील एकूण १६८ वाघांच्या मृत्यूपैकी सर्वाधिक ५२ मृत्यू देखील महाराष्ट्रातच झाले आहेत.
२०२२ मध्ये ११२ जण, २०२१ मध्ये ५९ जण, २०२० मध्ये ५१, तर २०१९ मध्ये ४९ जण आणि २०१८ मध्ये ३१ लोक वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले. या हल्ल्यांमध्ये केवळ महाराष्ट्रात १७० जण ठार झाले. त्यात २०२२ मध्ये ८५, २०२१ मध्ये ३२, २०२० मध्ये २५, २०१९ मध्ये २६ आणि २०१८ मध्ये दोन जण ठार झाले होते
उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांमध्ये ३९ जणांना वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला, त्यात २०२१ व २०२२ मध्ये प्रत्येक वर्षाला ११ जणांनी, २०२० मध्ये ४ जणांनी, २०१९ मध्ये ८ जणांनी, तर २०१८ मध्ये पाच जणांनी प्राण गमावले. पश्चिम बंगालमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये वाघांच्या हल्ल्याशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये शून्य, २०२० मध्ये एक, २०२१ मध्ये चार आणि २०२२ मध्ये नऊ, अशी वाघाच्या हल्ल्यातील बळींची संख्या आहे.


