मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांत बँकांमध्ये ७१ हजार ५४३ कोटींचे घोटाळे झाले असून, या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात कारवाई झालेली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
केंद्र आणि राज्याची ढासळती अर्थव्यवस्था तसेच मोदी आणि फडणवीस सरकारांच्या कारभारांवर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. देशातील बँकांमध्ये ७१ हजार ५४३ कोटींचे घोटाळे झाले आहेत. यापैकी ९० टक्के घोटाळे हे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झाले आहेत. एवढा घोटाळा होऊनही वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. एवढय़ा रकमेच्या घोटाळ्यास जबाबदार कोण आणि त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केली पाहिजे. मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. गतवर्षांच्या तुलनेत यंदा ३० हजार कोटींचा बँक घोटाळा झाला. आर्थिक पातळीवर आम्ही कठोर भूमिका घेतो, असा दावा पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडून केला जातो. मग बँकांमधील घोटाळा वाढला कसा?, असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.