मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संजय मोरे चालवत असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याची माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. पण बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा दावा संजय मोरे यांनी पोलिसांच्या तपासावेळी केला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक वाहन होते. कुर्ला स्टेशनहून येणाऱ्या या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. अर्पण हॉस्पिटलजवळ त्याचे नियंत्रण सुटले व सुमारे 500 मीटरपर्यंत त्याने रस्त्यावरील 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात 5 ते सहा ऑटो रिक्षांचा चक्काचूर झाला. दरम्यान, या अपघातात काही गाड्यांचा देखील चक्काचूर झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याचा आरोप देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
दरम्यान कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.