पुराचा पाणी आयएएस कोंचिग सेंटरच्या तळघरात शिरल्यामुळे ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी घुसल्याने ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेऊन कोचिंग सेंटरचा मालक आणि संयोजकाला अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, लायब्ररी ७ वाजण्याच्या सुमारास बंद होते. यावेळी सुमारे ३० विद्यार्थी उपस्थित होते. आम्हाला बाहेर पडण्यास सांगण्यात आले. सर्व विद्यार्थी तळघरातून बाहेर पडत होते. मात्र पाणी इतके वेगाने आले की, काही विद्यार्थी अडकले आणि दोन ते तीन मिनिटांत संपूर्ण तळघर तुडुंब भरले.

पावसाचे पाणी इतके घाण होते की, खाली काहीच दिसत नव्हते. शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींनुसार कोणत्याही कोचिंग सेंटर आणि लायब्ररीच्या इमारतींचे बांधकाम झालेले नाही. अपघातस्थळी बचावकार्यासाठी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त जागा नाही. याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे अशा घटना या भागात घडत आहेत. राव कोचिंग सेंटर बुडण्याच्या घटनेवर दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी म्हणाल्या की, अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफ घटनास्थळी तैनात होते. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही घटनास्थळी हजर होते. या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

Protected Content