पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी तापीनदीत ३ तास जलसमाधी आंदोलन

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील नागरिकांनी गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा समस्येला तोंड दिले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे नागरिकांत संताप आहे. याच मागणीसाठी 14 जानेवारी रोजी नागरिकांनी तापी नदी पात्रात तीन तासांची जलसमाधी आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले.

प्रशासनाला इशारा; १५ फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा सुरू करा
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, १५ फेब्रुवारीपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजना सुरू न झाल्यास २० फेब्रुवारीला महिला आणि नागरिकांचा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल, अशी त्यांनी तंबी दिली.

तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन
आंदोलनादरम्यान, नागरिकांनी तापी नदीच्या मध्यभागी उभे राहून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख लाख, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम कोळी आणि हाजी कदिर शेठ यांनी थेट नदी पात्रात जाऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी मुख्याधिकारी सचिन राऊत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी पोहोचून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी नागरिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि लेखी आश्वासन दिले की, १५ फेब्रुवारीपर्यंत नारीमाळा येथील पाणी टाकीतून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. शिवाय, विकास कॉलनी, पवन नगर, आणि प्रतिभा नगर येथे पाणी टाक्यांचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले.

मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी कठोरा येथील तापी नदी पात्रात नवीन जागवेल आणि इंटॅक्ट वेल मंजूर करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाईल, असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनीही पाणीपुरवठा समस्येवर लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

वरणगाव शहरातील नागरिक उन्हाळ्यापूर्वी पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आहेत. मात्र, योजनेची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यास, नागरिक आक्रमक आंदोलन करण्याची शक्यता आहे. यावेळी सुनील काळे यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर वेळेत अंमलबजावणी केली नाही, तर 20 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला जाईल.

पाणी ही मुलभूत गरज – प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वरणगाव शहरातील पाणीपुरवठा योजना अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. परिणामी, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी ही प्रत्येक नागरिकाची मुलभूत गरज असूनही, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे समस्या सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास, वरणगावकरांनी पुन्हा एकदा जनआंदोलनाची भूमिका घेतली आहे. महिलांसह संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे. यामुळे प्रशासनाला पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे.

मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना दिलासा देत सांगितले की, जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Protected Content