मुंबईत वृद्ध महिलेची ३.८ कोटी रूपयांची ऑनलाईन फसवणूक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फोन कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुका दिवसेंदिवस वाढत आहेत. पैसे कसे आणि कधी गमावले जातील हे सांगणेही कठीण आहे. असाच एक अनुभव मुंबईतील एका महिलेला आला. तिच्याकडून फसवणूक करणाऱ्यांनी एक-दोन लाख नव्हे तर तब्बल ३.८ कोटी रुपये लुबाडले.

एक महिन्यापूर्वी ७७ वर्षीय महिलेला व्हाट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला तेव्हा या घटनेची सुरुवात झाली. फोन करणाऱ्याने प्रथम सांगितले की तायवानला पाठवलेल्या एका बॉक्समध्ये एमडीएमए आहे. एमडीएमएच नव्हे तर त्यात पाच पासपोर्ट, एक बँक कार्ड आणि काही कपडेही आहेत, असेही कॉल करणाऱ्याने सांगितले. ही महिला मुंबईत निवृत्त पतीसोबत राहत होती. तिने कोणताही पार्सल पाठवला नसल्याचे तिने वारंवार सांगितले, पण कॉल करणाऱ्याने तिला धमकावले की तिच्या आधार कार्डचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करण्यात आला आहे. त्यानंतर, दुसऱ्या एका व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिस अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्यानेही महिलेचे आधार कार्ड असल्याचे सांगितले.

नंतर, एका व्यक्तीने स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्याने बँक खात्याची माहिती मागितली. तसेच महिलेला एका खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. सुरुवातीला १५ लाख पाठवण्यास सांगितले. कायदेशीर उल्लंघन झाले नसल्यास हे पैसे परत मिळतील असेही सांगितले. सांगितल्याप्रमाणे, महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी ते पैसे परत केले. नंतर, अधिकाधिक पैसे पाठवण्यास सांगितले. ते पैसे परत न मिळाल्यावर महिलेला संशय आला. तिने परदेशात राहणाऱ्या मुलीला ही गोष्ट सांगितली. मुलीनेच आईला फसवणूक झाल्याचे सांगितले आणि पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. एकूण ३.८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Protected Content