Home Cities अमळनेर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान; अमळनेर तहसीलदारांकडे पंचनाम्याची मागणी तीव्र

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान; अमळनेर तहसीलदारांकडे पंचनाम्याची मागणी तीव्र


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज तहसीलदार अमळनेर यांना निवेदन दिले.

खरीप हंगाम २०२५ मध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या होत्या. मात्र, सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. जुलै महिन्याच्या अखेरीस पुन्हा २२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने मुग, उडीद, सोयाबीन आणि मका ही पिके पूर्णतः वाया गेली. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटपासून सप्टेंबरअखेरपर्यंत झालेल्या सलग पावसामुळे कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि उत्पादनात मोठी घट झाली.

ऑक्टोबर महिन्यात मका काढणी आणि कापूस विक्रीच्या हंगामात पुन्हा अवकाळी पावसाने कहर केला. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा उरला-सुरला हमामही वाया गेला. मक्याच्या कणसांवर पाणी साचून नुकसान झाले असून, कापसाचे झाडांवरील बोंड सडून पडले आहेत. पपई, निंबू, केळी यांसारख्या पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष दाखल दाखवली. तहसीलदारांनी पंचनामे करण्याचे संकेत दिले असले तरी शेतकऱ्यांनी सावध राहून आपल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. निवेदन देताना सुरेश दादा, धनगर अण्णा, विश्वास आबा, प्रताप आबा, विजय पाटील, दिनेश पाटील, भगवान संदनशिव, घोलप, राजेंद्र पाटील, गोकुळ पाटील, छोटू पाटील, सुनील पाटील, मयूर पाटील, न्हानभाऊ पाटील, मधु दादा, दिलीप बापू आणि विठ्ठल पवार यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी २०२१ मधील अतिवृष्टीचे अनुदान आजतागायत न मिळाल्याबद्दल प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत, याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound