पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्याचे आराध्य दैवत श्री प्रभू बालाजी महाराज यांच्या मंदिराची ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्य माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका नुकतीच मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली. पारोळा येथील हे मंदिर “प्रति तिरुपती” म्हणून प्रसिद्ध असून, या ग्रंथरूप पुस्तिकेमुळे भक्तांना मंदिराच्या परंपरा, रचना आणि आध्यात्मिक प्रवासाचा सविस्तर परिचय होणार आहे.
या पुस्तिकेत श्री बालाजी महाराज पारोळ्यात कसे प्रकट झाले, याची भक्तीमय कहाणी नमूद करण्यात आली आहे. भक्त कै. गिरीशेठ शिंपी यांच्या झोळीत गिरी पर्वतावरून बालाजी महाराज पारोळ्यात प्रकट झाल्याचा उल्लेख यात आहे. तसेच राजस्थानातील गुलाबी बन्सी पहाड दगडात सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दाक्षिणात्य शैलीतील मंदिराच्या रचनेचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. गर्भगृह, सभामंडप, तसेच ७१ फूट उंचीच्या गोपूरमवरील शिल्पकलेचे बारकावे व त्यातील सांस्कृतिक संदेश यांची माहिती वाचकांना यात मिळते.

पुस्तिकेत नवरात्रीतील ब्रह्मोत्सव आणि त्यानिमित्ताने होणारे विविध धार्मिक कार्यक्रम जसे की ध्वजस्तंभ पूजन, गरुडस्तंभ पूजन, तसेच दररोज निघणाऱ्या वहनांची माहिती समाविष्ट आहे. प्रत्येक वहनाच्या सोहळ्यात असणाऱ्या बाहुल्यांचे धार्मिक महत्त्व आणि पारंपरिक सादरीकरण याचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील सर्वात उंचीचा असलेल्या रथाची रचना, वजन, आणि निर्मिती इतिहास, तसेच श्री वहनावरून खाली येताना शेकडो भक्तांनी घेतलेल्या आरतीचा अर्थ, पालखी सोहळा, शिंपी घराण्याची पिढ्यानपिढ्या सुरू असलेली सेवा परंपरा यांचेही सविस्तर वर्णन या पुस्तिकेत आढळते.
या माहिती पुस्तिकेची संकल्पना, माहिती संकलन आणि रचना विश्वस्त रावसाहेब भोसले यांनी केली असून, ३८५ वर्षांच्या परंपरेचा सखोल आढावा त्यांनी यात घेतला आहे. या प्रकाशन सोहळ्यास मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, विश्वस्त माजी खासदार ए. टी. पाटील, विश्वस्त रावसाहेब भोसले, केशव क्षत्रिय, अरुण वाणी, अभय शिंपी, दिनेश गुजराथी, माजी नगरसेवक मनिष पाटील, नितीन सोनार, अर्चक हरीश पाठक, तसेच बालाजी स्वयंसेवक, मोगऱ्या लावणारे बांधव, चोपदार, भेरवाले आणि मशालवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.



