रावेरमध्ये भेसळयुक्त मिठाईवरून खळबळ; नागरिकांचा अन्न प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईचा आग्रह


रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात दुसऱ्या राज्यातून आलेल्या मिठाईवरून मोठा वाद उद्भवला असून, खराब मिठाई विकल्याच्या आरोपावरून एका मिठाई विक्रेत्या आणि ग्राहकामध्ये रदार बाचाबाची झाली. अखेर परिस्थिती चिघळू नये म्हणून संबंधित विक्रेत्याने ग्राहकाची नुकसानभरपाई करून प्रकरण मिटवले, तरीही दिवसभर शहरभर या घटनेची जोरदार चर्चा रंगली.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर असताना मिठाई खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही विक्रेते निकृष्ट दर्जाच्या व भेसळयुक्त मिठाईची विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. जलद नफा कमावण्यासाठी काही व्यापारी दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून मिठाई बाजारात आणत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने अधिकृत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने प्रकरण अधिकृतरीत्या दडपले गेले असले, तरी नागरिक वर्गात तीव्र असंतोष दिसून येत आहे. “अशा घटना वारंवार घडत असतील तर त्यावर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी ग्राहक संघटनांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित मिठाई विक्रेत्याने “असे काही घडलेच नाही” असा दावा करत आपली बाजू मांडली आहे. तथापि, शहरातील नागरिकांनी परराज्यातून येणाऱ्या मिठाईंची गुणवत्ता तपासूनच विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्न प्रशासनाकडून नमुना तपासणी मोहिम राबवून सणासुदीच्या काळात निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर लगाम घालावा, अशी जनतेकडून मागणी करण्यात येत आहे.