Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्यातून जनजागृती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्यातून जनजागृती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे ‘प्रवर्तन फाउंडेशन, नाडगाव’ तर्फे सादर करण्यात आलेल्या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे असल्याचा प्रभावी संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उप-अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता गावित, प्राचार्य कविता नेतकर, प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुंभ आणि अधिसेविका संगीता शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. गिरीष ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या ताणतणावाच्या जीवनात मानसिक आरोग्य जपणे अत्यावश्यक आहे. ‘प्रवर्तन फाउंडेशन’ने पथनाट्याच्या माध्यमातून हा संवेदनशील विषय लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचवला आहे. विद्यार्थ्यांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी.”

मनोविकार विभागाच्या डॉ. शताक्षी वाघजाळे, डॉ. मनिषा महाजन, तसेच समुपदेशक विजयेंद्र पालवे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पथनाट्याचा मनमुराद आनंद घेतला. जनजागृतीच्या या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या मनोविकार विभागाचे प्रमुख डॉ. यश महाजन आणि ‘प्रवर्तन फाउंडेशन’च्या अध्यक्षा दिव्या पालवे यांनी मार्गदर्शन केले.

पथनाट्याद्वारे मानसिक तणाव, नैराश्य, सामाजिक दबाव आणि आत्मसंवादाचे महत्त्व या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. साध्या, परंतु परिणामकारक अभिनयातून मांडलेला हा संदेश उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवणारा ठरला. प्रेक्षकांनी कलाकारांना टाळ्यांचा गजर करून भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक जागरूकतेचे कार्यही साधले. मानसिक आरोग्य या दुर्लक्षित विषयावर समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला, हे विशेष.


Protected Content

Play sound