अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी: : तालुक्यातील खेडी बु. प्र. डांगरी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांना दाणे न लागल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून याबाबत आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, खेडी. बु. प्र. डांगरी येथील शेतकरी सुदाम पाटील, विश्वास पाटील, गोटूसिंग परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील यांनी एडव्हाटा कंपनीचे मका बियाणे अमळनेरच्या वेगवेगळ्या कृषी केंद्रामधून खरेदी केले होते. जून महिन्यात शेतात मका लागवड करण्यात आली होती. मात्र मका पिकाला दाणेच आले नसल्याने संबंधीत शेतकऱ्यांनी १० सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयात तक्रार केली होती.

ता.१९ सप्टेंबर रोजी बाधित शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राला उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी हेमंत बाहेती, एस. पी. वानखेडकर मका पिकाची पाहणी करीत पंचनामा करण्यात आला आहे. यात पाच बाधित क्षेत्राला भेट देत पाहणी करून बाधित क्षेत्रात ७०% टक्के उत्पन्नात घट आली असल्याचे सांगितले तर मका कणसे त्रिशूल अवस्थेत आढळून आले आहेत.तालुक्यात अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे शक्यता नाकारता येत नाही.याबाबत सदर शेतकरी ग्राहक मंचात तक्रार करणार आहेत.
दरम्यान, एकीकडे राज्यात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती ने शेतकरी हैराण असतांना दुसरीकडे धान पिकांचा नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडला असून,आता दाद कुणाकडे मांगावी?असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
आमदारांचे कृषी मंत्र्याना पत्र : आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत पत्र व्यवहार केले असून खेडी येथील शेतकऱ्यांनी एडव्हाटा कंपनीचे मका बियाणे यात बॅच नं- 006, 001, 0115, 48051 लागवड केली होती. मात्र कणसांना दाणेच लागले नसल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.



