मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी २९ मतांचा पहिला कोटा निश्चीत केल्याची माहिती समोर आली असून यामुळे यात त्यांचा पहिल्याच फेरीत विजय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतारले होते. संख्याबळानुसार दोन्ही जागा निवडून येण्यासाठी त्यांना फक्त एका मताची गरज होती. मात्र राज्यसभेतील चूक टाळण्यासाठी मविआच्या नेत्यांनी खूप सावध पाऊले उचलली. यासाठी पहिल्याच फेरीत उमेदवार निवडून येतील अशी रणनिती आखण्यात आली यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूत्रे हाती घेतली. रात्री उशीरापर्यंत मतांचे नियोजन करण्यात आले. यात पहिल्या प्रेफरन्सचे २९ मते टाकावीत असे ठरविण्यात आले. यात पहिल्यांदा निंबाळकर यांना २९ मते देण्यात आली. तर कोट्यापेक्षा जास्त झालेली तीन मते ही एकनाथराव खडसे यांना आपोआप जाणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांना पहिले प्राधान्य दिल्यामुळे त्यांना अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या उमेदवारांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
कोणतेही मत न फुटता यानुसार मतदान झाले असेल तर रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे हे पहिल्याच फेरीत निवडून येतील अशी शक्यता आहे. अर्थात, याबाबतची स्थिती लवकरच स्पष्ट होणार आहे.