Home Cities जळगाव शासकीय अभियांत्रिकीमध्ये दीक्षांत समारंभात 287 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

शासकीय अभियांत्रिकीमध्ये दीक्षांत समारंभात 287 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे दि. 31 जानेवारी 2026 रोजी दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या सोहळ्याने महाविद्यालय परिसर आनंद, अभिमान आणि नव्या अपेक्षांनी भारावून गेला होता.

या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी भूषविले. कार्यक्रमास नियामक मंडळाचे सदस्य मनोज पाटील व संजय बिर्ला, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. श्रीपाद मोहनी, परीक्षा नियंत्रक डॉ. तुकाराम गवळी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. समाधान कुलकर्णी यांच्यासह विविध अभियांत्रिकी विभागांचे प्रमुख व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तांत्रिक ज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि नवोन्मेषी विचारांची गरज अधोरेखित केली. नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध शाखांतील एकूण 287 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले. सुवर्णपदक स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत कुसुमकर रोहित, संगणक अभियांत्रिकी शाखेत पाटील विद्या, विद्युत अभियांत्रिकी शाखेत सोनावणे प्रांजल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत जाधव मानसी, इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखेत पाटणकर वैष्णवी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत हजारे युवराज यांनी पटकावले.

रौप्यपदक स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत वाणी नेहा, संगणक अभियांत्रिकी शाखेत पाटील भाग्यश्री, विद्युत अभियांत्रिकी शाखेत झाडे समिक्षा तर इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखेत करोडपती यशश्री यांनी मिळवले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत अटकारी आयुष आणि संगणक अभियांत्रिकी शाखेत महाले चेतना यांनी तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.

या दीक्षांत समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक अधिष्ठाता विभागातील जनार्दन जाधव, अंकुश कुलकर्णी, चेतन चौधरी, राजेंद्र वाणी, श्रीमती गायत्री लावरे, परशुराम धनगर तसेच महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि दीक्षांत समारंभ विद्यार्थी संघटनेने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. तुकाराम गवळी यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.


Protected Content

Play sound