श्रीनगर, वृत्तसंस्था | काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी तोंडावर पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच सात लाँचपॅड तयार करण्यात आले असून २७५ दहशतवादी तेथे सक्रीय झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी अफगाण आणि पश्तून सैनिकही तैनात करण्यात येत आहेत. पुढील महिन्यात दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणारी ‘फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ पाकिस्तानच्या भवितव्यावर निर्णय घेणार आहे. अशा अटीतटीच्या परिस्थितीत पाकिस्तानकडून या कुरापती सुरू आहेत.
यापूर्वीही १९९० च्या दशकात पाकिस्तानने परदेशी मुलांचा काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्यासाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापर केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी वॉरदरम्यान पाकिस्तानने हा डाव खेळला होता. भारताने जेव्हा दशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली तेव्हा पाकिस्तानने आपली रणनिती बदलली आहे.
पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय मिळून भारताविरोधात कारवाया करण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहेत. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान दशतवाद्यांना तयार करत आहे. तसेच लाँचपॅडही उभारण्यात येत आहेत. अनेक दहशतवादी काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.