जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शनिवारी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीणसह शहरातील तक्रारदारांनी उपस्थिती लावित आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी ४० तक्रारींपैकी २५ तक्रारीचे जागेवर निराकरण करुन उर्वरीत तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत.
पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निराकरण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील जळगाव उपविभागातर्फे तक्रार निवारण दिन (जनता दरबार) चे शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या कालावधीत मंगलम सभागृहात आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या उपस्थितीत जनता दरबाराला सुरुवात झाली. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ४० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २५ तक्रारींचे जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांसमोर निपटारा करण्यात आला. तर उर्वरीत तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली होती. त्या प्रकरणांची चौकशी करुन त्या तक्रारींचे देखील निकाली काढण्यात येणार आहे. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.